वडेट्टीवार यांना उमेदवारी फिक्स, प्रमोद चिमुरकर काय भूमिका घेणार?
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीचा काही ठिकाणी जागा वाटपाचा गुंता अद्यापही सुटला नसल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीत ब्रम्हपुरी विधानसभेची जागा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना निश्चित आहे. भाजपने पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचे नाव जाहीर केले आहेत मात्र. यात ब्रम्हपुरी चा उल्लेख नसल्याने इच्छुक उमेदवारांचे टेन्शन वाढले.
Whatsapp Channel |
ब्रम्हपुरी विधानसभेच्या जागेवरून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदेगट) यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये २०१९ ची जागा ही शिवसेनेला सोडण्यात आली. यात शिवसेना उमेदवाराचा वडेट्टीवार यांच्याकडून पराभव झाला. पुन्हा शिवसेनेला संधी देण्यात यावी याकरिता शिंदे गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे संघटन गावोगावी मजबूत आहे. भाजपची मतांची टक्केवारी जास्त असल्याने ही जागा भाजपला मिळावी याकरिता भाजप कार्यकर्ते आक्रमक असून कार्यकर्त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकला आहे. तर ही जागा राष्ट्रवादीला यावी याकरिता अजितदादा यांच्याकडे राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला तिकीट न मिळाल्यास महायुतीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केले नसले तरी काँग्रेसचे विरोधी पक्षनेता आमदार विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी विधानसभेची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागणी केली होती. मात्र ही उमेदवारी वडेट्टीवार यांच्या पारड्यात पडल्यावर प्रमोद चिमूरकर काँग्रेसला समर्थन देणार का, अपक्ष लढणार ? की, विरोधी भूमिका घेणार ? याकडे काँग्रेस वर्तुळासह विधानसभा क्षेत्रात जनतेचे लक्ष लागून आहे.
महायुतीत उमेदवारी ही भाजपला द्यावी. व उमेदवार हा कुणबी द्यावा ही मागणी असल्याने स्थानिक प्रबळ दावेदार उमेदवारासह विधानसभा क्षेत्रा बाहेरील उमेदवारांनी कुणबी फॅक्टरचा फायदा होईल म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. स्थानिक उमेदवाराला संधी न दिल्यास महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात. तर महायुतीच्या सस्पेन्स भूमिकेमुळे महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. महायुतीच्या उमेदवाराकडे काँग्रेस वर्तुळाचेही लक्ष लागून आहे.