चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघात आज झंझावाती दौरा केला. या दरम्यान झालेल्या सभाना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी संवाद साधला. सभेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर चिखलफेक करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच खरी वेळ असल्याची गर्जना राजुरा येथे झालेल्या सभेत धानोरकर यांनी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, महाविकास आघाडीचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभा मतदार संघाचा मंगळवारला दौरा केला. मतदार संघातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या करंजी, वढोली, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, लाठी, सकमुर, तोहोगाव, चक तळोधी या गावांना भेट दिली. राजुरा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विरूर गावातील ग्रामस्थांची संवाद साधण्यात आला. राजुरा येथे भव्य अशी सभा झाली. ही लढाई माझी व्यक्तिगत नाही. ही लढाई आपल्या सर्वांची आहे.
हुकूमशाहीच्या विरोधात एकमताने आवाज बुलंद करायला हवा. मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून हा आवाज बुलंद होत आहे. या आवाजात तुमचा आवाज मिळाला तर हुकूमशाहीचे तक्त थरथर कापायला लागेल, असे आव्हान धानोरकर यांनी केले. पुढे त्या म्हणाल्यात, बहिणीसाठी भाऊ जीव ओवाळून टाकत असते. आई-वडिलांनंतर भाऊ हाच बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मात्र भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्यावर मुनगंटीवार यांनी चिखलफेक केली. प्रत्येक बहिणीचं मन दुखावल आहे. ज्यांनी भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अनादर केला त्यांना त्यांची खरी जागा दाखवण्याची हीच खरी वेळ आहे, अशी गर्जना धानोरकर यांनी केली. यावेळी राजुरा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती.