महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याने याबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाण करणारा नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर हा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे.
Whatsapp Channel |
प्राप्त माहितीनुसार, घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या गावाचा प्रभार आहे. नेहमी प्रमाणे आज परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनी जवळ अडवीलं. बंदुरकर म्हणाले की डीपी जवळ काम आहे, नकोड्याला चला. नकोड्याला गेल्यावर त्यांनी मला माझ्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधलं. गावाकऱ्यांना गोळा केलं. साधारणता दोन तास त्यांनी बांधून ठेवलं.
घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले. त्यानंतर त्यांनी सरड पोलीस स्टेशनला धाव घेतली. मागील काही दिवसापासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. त्या रागातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करीत आहेत.