‘तिनं तिघाडा काम बिघाडा’ अशी जुनी म्हण आहे. नेमका याचा प्रत्यय राजुरा विधानसभा क्षेत्रात भा.ज.पा. गोटात बघायला मिळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करताना दिसतात. प्रत्यक्ष विधान सभेची लढत काट्याची होईल की नाही याबाबत नंतर कळेल मात्र भा.ज.पा. (BJP) अंतर्गत उमेदवारीसाठी होणारी तिरंगी लढत नक्की काट्याची होणार यात शंका नाही. उमेदवार निवडी नंतर अंतर्गत ‘मनभेद’ कायम राहीले तर भा.ज.पा. गोटात निराशेचे वातावरण राहू शकेल अशीही जनचर्चा आढळल्यास नवल नाही. गत लोकसभा निवडणूकीत भा.ज.पा. उमेदवाराच्या मोठया पिछाडीने ‘हायकमान’ टेंशन मध्ये असू शकते.
Whatsapp Channel |
यात आता उमेदवारीवरून तिनही शिलेदार आमने सामने येतील हे मोठे टेंशन पक्षांसमोर असू शकेल. एकाला ‘बाशिंग’ बांधल्यास इतर दोन काय भुमिका घेतील यावर भा.ज.पा. चमूमध्ये घुसपुस सुरू झाल्याची चर्चा आहेच.
Rajura Assembly राजुरा विधानसभा क्षेत्र गत २० वर्षापासून आलटून पालटून शेतकरी संघटना, भा.ज.पा., कांग्रेस या पक्षांना भावले आहे. २०१४ मध्ये भा.ज.पा. चे ॲड. संजय धोटे व २०१९ मध्ये कांग्रेस चे सुभाष धोटे विधानसभेत गेलेत. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी ला रामराम करून माजी आमदार सुदर्शन निमकर राजकीय महत्वाकांक्षा बाळगून भा.ज.पा. त आलेत. २०१९ मध्ये ॲड. संजय धोटे पराभूत झाल्यानंतर झेड.पी. तून डायरेक्ट विधानसभेत जम्प मारण्याच्या मोठ्या महत्वाकाक्षेने या क्षेत्रावर नजर ठेवून ना. मुगंटीवारांचे कट्टर समर्थक माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे या क्षेत्रात बिऱ्हाड थाटून कामाला लागले. भा.ज.पा. अंतर्गत आता तिन शिलेदार उमेदवारीसाठी मैदानात राहणार हे जवळपास निश्चित. यातून मुंबईसाठी कुणाची टिकीट पाडायची हे भा.ज.पा. हायकमान ठरवेल व इतर दोघांना पक्षासाठी काम करण्याच्या रितीरिवाजानुसार सुचना देण्यात येऊ शकतात. मात्र इथे तीन तिघाडा झाल्यास आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरल्याचे मोठे दुःख विसरून उमेदवारी न मिळालेले इतर दोघे मनापासून काम करतील काय? हा सवाल कायम राहतो.
देवराव भोंगळे दुसऱ्या क्षेत्रातून आयात झालेले आहेत तर सुदर्शन निमकर हे दुसऱ्या पक्षातून आयात झाले आहेत. मतदारा संघातील जनतेचा संजय धोटे साहेब जनसंपर्कात कमी पडतात असा आरोप राहिलेला आहे. व कदाचीत यामुळेच देवराव भोंगळे यांची क्षेत्रात एन्ट्री करण्यात आली असावी असाही एक सुर आहे.
बाहेरून आलेल्या भोंगळे ना इथे स्थायीक करण्यास व आपले पुढील राजकीय अस्तित्व संपविण्यास इतर दोघे तयार होतील असे सध्यातरी जाणकाराना वाटत नाही.
लोकसभा निवडणुकीत राजुरा विधानसभेची कांग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिल्याने व दुसरा स्पर्धक नसल्याने किंवा तयार न होऊ देण्यात आल्याने विद्यमान आमदार सुभाष धोटे बिनधास्त आहेत. भा.ज.पा. अंतर्गत ‘तिरंगी’ लढतीचा फायदा ते घेऊ शकतात. मात्र शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांची उमेदवारी राहीली तर मतांचे गणीत खालीवर होऊ शकेल.
गत २५ वर्षात जिवती तालुक्यातील पाणी व जमिनीच्या पट्ट्यांचा भारी सवाल कायम राहीला आहे. वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनीही शब्द न पाडल्याचा रोष कायम आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या विधानसभा क्षेत्रात घडलेल्या आहेत हा गंभीर रोष कायम असल्याचे बोलल्या जाते. वैनगंगा नदी पात्रावर बसलेल्या या मतदारसंघातील मोठ्या क्षेत्रावर सिंचन सोयी करण्यात आमदार मंडळी अपयशी ठरल्याची सल तेवत असलेली दिसते. अशा स्थितीत या विधानसभा निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी (अजीत दादा), यासारखी युवा मंडळी येत्या निवडणुकांमधून आपल्या पुढील राजकीय भविष्याची दमदार बॅटींग करतील व मतदार त्यांना मोठे समर्थन देतील अशीही चर्चा सुरू आहे.