बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले
माजी आमदार आणि शेतकरी नेते ऍड. वामनराव चटप यांनी कित्येकदा राजकारणातून निवृत्ती जाहीर केली, पण त्या घोषणा नेहमीच अपूर्ण राहिल्या. यावेळीही चटप यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे राजुरा विधानसभेचे चित्र कसे असेल, यावर चर्चा रंगली आहे.
Whatsapp Channel |
भोंगळे विरुद्ध धोटे
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे देवराव भोंगळे आगामी निवडणुकीची तयारी जोरात करीत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात त्यांचे दौरे वाढले आहेत. परंतु, माजी आमदार ऍड. संजय धोटे उमेदवारी सोडणार असे दिसत नाही. मागील निवडणुकीत धोटे पराभूत झाले तरी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध कायम ठेवले आहेत. त्यांच्या जनसंपर्क मोठा आहे. दुसरीकडे, भोंगळे यांना केवळ सुधीर मुनगंटीवार यांचा आधार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या उमेदवारीकडे अधिक लक्ष देणारं, हे ठरलेले. लोकसभेत झालेल्या पराभवामुळे बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. अश्यात स्वतःच सोडून दुसऱ्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भोंगळे यांना भक्कम आधार मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ही परिस्थिती बघता माजी आमदार संजय धोटे यांचे पारडं जड असल्याचे मानलं जात आहे.
चटप की धोटे
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राजुरा विधानसभेत आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांच्यात थेट लढत झाली होती. सुभाष धोटे यांच्या विजयामुळे 2024 च्या निवडणुकीतही असंच चित्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धोटे यांनी लोकसभेत प्रभावी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, राज्यात महायुतीविरोधात वातावरण असल्याने काँग्रेसला फायदा होऊ शकतो. चटप यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यात राजुरा विधानसभेत काही नवीन चेहरे दिसणार आहेत.त्यामुळे मतं विभाजन होणार असल्याने, होणारे मत विभाजन कुणाच्या फायद्याचं ठरेल, हे येणारा काळ ठरवणार आहे.
राजुरा विधानसभा निवडणुकीत चटप आणि धोटे यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे. चटप यांच्या पुनरागमनाने निवडणुकीत रंगत येईल, परंतु धोटे यांची सध्याची स्थिती मजबूत आहे. मतविभाजन कोणाच्या बाजूने झुकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.