महाविकास आघाडीत काँग्रेस फिक्स, राष्ट्रवादी (अजित पवार), भाजपमध्ये रस्सीखेच
राज्यामध्ये होत असलेल्या राजकीय बदलांमुळे महायुती व महाविकास आघाडी (MVA) असे राजकीय समीकरण तयार झाले आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला नसल्याने महायुती व महाविकास आघाडीचे अद्यापही जागा वाटपावरून एकमत झाले नसल्याचे रोजच्याच घटनांवरून दिसून येत आहे. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी पुढे होणारी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार यात तिळमात्र शंका नाही.
Whatsapp Channel |
कुणबी उमेदवारच हवा ही चर्चा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात (Bramhapuri Assembly) जोरात सुरू आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्या इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी जोमात सुरु आहे. महाविकास आघाडीची (MVA) जागा काँग्रेसला फिक्स समजली जात असून महायुतीत भाजप (BJP), राष्ट्रवादीमध्ये (NCP) जागे करिता रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडी आणि महायुतींच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यात लोकसभेत मिळालेले यश विधानसभेतसुद्धा मिळावं आणि चांगला समन्वय राहावा यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP- Sharad Pawar) शरदचंद्र पवार पक्ष आपल्या ताकद असलेल्या जागांचा अभ्यास करून त्या जागांची तयारी करीत आहेत. महायुतीतील (Mahyuti) भाजप शिवसेना (Shivsena- Ekanath Shinde Group) शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP- Ajit Pawar) अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला जागा वाटपात झालेला गोंधळ लक्षात ठेवून तिन्ही पक्ष विधानसभेला चांगले यश कसे मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक जागा मिळवण्याच्या तयारीत आहेत. जागा वाटपावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसताना ब्रम्हपुरी विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीची जागा ही काँग्रेसला फिक्स समजली जात असून विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महायुतीत सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजप मध्ये जागे करिता रस्सीखेच सुरू आहे.
“seat allocation in the Brahmapuri Assembly constituency for the 2024 Maharashtra elections, as the BJP, Shiv Sena, and NCP decide the final formula within the Mahayuti alliance.”
जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी आपल्याच पक्षाला जागा असणार या दृष्टीने उमेदवारी करता इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) विधानसभा प्रमुख विनोद नवघडे, भाजपचे माजी आमदार अतुल देशकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, प्रकाश बगमारे, अविनाश पाल यांनी विधानसभा (ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही) क्षेत्रात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीत भाजप राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र असले तरी जागा कुणाच्या वाट्याला येणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षांच्या मतांची टक्केवारी किती
2004 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे अतुल देशकर यांना 52953 मते व राष्ट्रवादी-काँग्रेस चे उमेदवार दामोदर मिसार यांना 38777 मते तर अपक्ष उमेदवार वसंत वारजूकर यांना 23949 मते मिळाली. 2009 मध्ये भाजपचे अतुल देशकर यांना 50340 मते मिळाली व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप गड्डमवार यांना 44845 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार पंकज गुडडेवार यांना 30265 मते मिळाली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विजय वड्डेट्टीवार यांना 70373 मते मिळाली तर भाजपचे अतुल देशकर यांना 56763 मते मिळाली. राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार यांना 44878 मते मिळाली. 2019 मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 96723 मते मिळाली. तर शिवसेना-भाजपचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना 78177 मते मिळाली.
2004 व 2009 मध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये मतांची विभागणी झाल्याने भाजपचे माजी आमदार अतुल देशकर हे विजयी झाले. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याने काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे निवडून आले. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये लढल्याने याचा फायदा पुन्हा आमदार विजय वडेट्टीवार यांना झाला. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात भाजपची मतांची टक्केवारी ही सर्वाधिक असून काँग्रेसची मदार ही राष्ट्रवादीच्या मतावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी पक्ष हा भाजप व काँग्रेसच्या विजयाकरिता किंग मेकर असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजप एकत्र असल्याने निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. मात्र दोन्ही पक्षात जागे करिता रस्सीखेच सुरू असल्याने ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.